प्रभात वृत्तसेवा पुणे – औंध आणि लोहगाव या दोन्ही ठिकाणी फिरत असलेले बिबटे अद्याप वन विभागाच्या जाळ्यात अडकले नाहीत. ते अजूनही ‘आउट ऑफ रिच असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.औंध येथे २३ नोव्हेंबर रोजी बिबट्या आढळला होता. त्याआधी लोहगावमध्ये बिबट्या आढळून आला होता त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याठिकाणी वन विभागाने गस्त सुरू केली असून, लोहगाव विमानतळानजीक आठ पिंजरेही लावण्यात आले आहेत. रेस्क्यू टीम आणि वन विभाग हे या मिशनवर एकत्रित काम करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही कॅमेऱ्यात बिबटे कॅप्चर झाले नसल्याचे वन विभागाने सांगितले आहे. या दोन ठिकाणी बिबट्या असल्याचे दिसून आले आहेच; परंतु अन्य भागामध्ये एआयच्या सहाय्याने व्हिडिओ, छायाचित्रे तयार करून अफवा पसरवण्यासाठी वापरली जात आहेत. याशिवाय शस्त्र घेऊन फिरण्याचे आवाहन वन विभागाने केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, वन विभागाने ही अफवा असल्याचा खुलासा केला आहे. औंध, लोहगावमधील नागरिकांना मात्र सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.