पुणे- ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार असल्याने भारतीय संस्कृती निरंतर आहे आणि याचा अर्थ भौतिकता व विज्ञानाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. एकात्मता ही भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे आणि विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे महत्त्वाचे आहे. ज्ञानदृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन खान यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते. खान यांनी ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वात प्राचीन मानले असल्याचा उल्लेख करून, भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती असल्याचे सांगितले. अरबांनी भारतीय साहित्याचा पहिल्यांदा अनुवाद केला आणि युरोपच्या अवकाश अभ्यासाचा आधार असलेला ‘सूर्य सिद्धांत’ हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेल्याचे त्यांनी सांगितले. अरबीमध्ये ‘हिंद’ या शब्दाचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो आणि ही सुंदरता ज्ञानाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. मिलिंद मराठे म्हणाले की, पुन्हा पुन्हा वाचले जाते ते अभिजात साहित्य असते, ज्यात ज्ञान, मनोरंजन आणि समाजाला दिशा देण्याची ताकद असते. राजेश पांडे यांनी सांगितले की, तरुण वाचतात हे या महोत्सवाने सिद्ध केले असून, ‘वाचा, ऐका आणि भारत समजून घ्या’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे.