नगरपरिषद निवडणुकीत आजपासून प्रचाराला अधिक रंगत फुरसुंगी – नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप बुधवारी (दि. 26) होणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार रंगात येणार असून आपले चिन्हे मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी उमेदवारांना चार दिवसच मिळणार आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची परिसरातही अपक्षांच्या प्रचाराचा धुरळा उद्या दुपारपासूनच उडणार आहे. राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार 21 नोव्हेंबरपासूनच चिन्हासह प्रचार करीत आहेत. त्यात, बुधवार पासून अपक्षांचाही प्रचार सुरू होत आहे. फुरसुंगी-उरूळी देवाची नगरपरिषद निवडणूक रिंगणात अपक्ष १७ आहेत. तर, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ३२, भाजप २३, शिंदे शिवसेना २१, उद्धव ठाकरे शिवसेना १५, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ७ यासह काँग्रेस, बसपा आणि आम आदमी पक्षाचा १ उमेदवारांचा प्रचार आजपासून जोर पकडणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी दि. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. 21 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. नगराध्यक्षपदासाठी 153 जण, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 1 हजार 574 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यस्तरीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार अर्ज माघारीनंतर चिन्हासह जोमात प्रचार करीत आहेत. मात्र, अपक्षांना चिन्ह वाटप पाच दिवस उशिरा करण्यात आल्याने त्यांना प्रचारसाठी कमी वेळ मिळाला आहे. प्रचारासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक असताना अपक्ष उमेदवार चिन्ह मिळत आहे. अपक्ष उमेदवार मतदारांच्या ओळखीचे असले तरी त्यांना नव्याने मिळालेले चिन्ह मतदारापर्यंत माहिती पोहोचविणे मोठी कसरतीचे ठरणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या तुलनेत अपक्ष उमेदवारांकडे प्रचार यंत्रणा भक्कम नसते त्यातच आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी केवळ चार दिवसच मिळणार असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारांमुळे दि. 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारांकडून तीन प्राधान्यक्रमानुसार चिन्हांची मागणी घेतली जाते. एका चिन्हासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांची मागणी असल्यास सोडतीद्वारे अशा चिन्हाचे वाटप केले जाते. घोंगडी बैठका आणि… राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळाला आहे. त्यात तुलनेत अपक्षांना आज चिन्हे मिळत असल्याने चार ते पाच दिवस प्रचारासाठी कमी पडतील, अशी चर्चा असतानाच अपक्षांनी आचारसंहितेचे नियम पाळून प्रचाराचे वेळपत्रक आखताना दिवसभरासह रात्रीच्यावेळी घोंगडी बैठका, वैयक्तिक भेटी, जवणावळी अशा प्रचारावरही अधिक भर दिला आहे. यातून प्रचारासाठी अधिकचा कालवधी मिळेल, अस गणित साधले जात आहे.