पुणे – राज्यासह देशात कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील आढावा घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला.दरम्यान, धुके व कमी दृश्यमानतेच्या वेळी योग्य समन्वय ठेवून विमान उड्डाणे सुरळीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी टर्मिनल सुविधा, प्रवाशांना माहिती देण्याची व्यवस्था, विविध विमान कंपन्यांचे काउंटर तसेच ग्राउंड हॅण्डलिंग ऑपरेशन्स या ठिकाणांची पाहणी केली. धुक्यामुळे उड्डाणांमध्ये व्यत्यय आल्यास त्याचा परिणाम प्रभावीपणे हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी पुणे विमानतळ प्रशासन, सीआयएसएफ, सर्व विमान कंपन्या तसेच ग्राउंड हॅण्डलिंग एजन्सींच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठकही घेण्यात आली. धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाल्यास त्याबाबत अचूक आणि वेळेवर माहिती प्रवाशांना आधीच देण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले.