पीएमआरडीएकडून हद्दीतील गावांना स्वच्छ, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील २७ गावांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण देण्यासाठी 16 गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश स्वच्छता पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, प्रगत सांडपाणी विल्हेवाट प्रणाली विकसित करणे आणि कार्यक्षम व किफायतशीर सांडपाणी प्रक्रिया राबवून नद्यांचे प्रदूषण कमी करणे हा आहे. हे प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन उद्दिष्ट प्राधिकरणाने ठरविले आहे. प्राधिकरणाच्या कार्यालयात यासंदर्भात आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या उपस्थित ही बैठक झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह संबंधित २७ गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पीएमआरडीएने 1 हजार 200 कोटी रुपयांच्या खर्चाचा सांडपाणी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती आणि उद्योगासारख्या कामांसाठी पुनर्वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे. महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी प्रशासनाला हे प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत.