पुणे – पीएमपीएमएलमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल ३० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती पावले न उचलल्यास १ डिसेंबरपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट मुख्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीएमपीएमएल कामगार संघाने दिला आहे. अनेक वेळा आंदोलने, निदर्शने, निवेदने अशा अनेक मार्गांनी मागण्या केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याने हे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होत असल्याचे संघाने म्हटले. १ एप्रिल २०१७ ते ३० नोव्हेंबर २०२३ च्या काळात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सात लाख रुपयांची ग्रॅच्युइटी अदा करण्यात आली असून, सेवकांच्या उर्वरीत थकीत उपदान व रजा रोखीकरण फरकाची रक्कम सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्यात यावी, डिसेंबर २०२३ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणाऱ्या थकीत फरकांची रक्कम, तसेच थकीत रजा रोखीकरणाची रक्कम महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ प्रमाणे निश्चित कालावधीत एकवटीने अदा करावी, पीएमपीएमएलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अंशदायी वैद्यकीय योजनेची रक्कम पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करत बंद केली आहे, ती तात्काळ सुरू करावी आणि सातव्या वेतन आयोगान्वये मान्य दहा, वीस, तीस वर्ष सेवा कालावधीसाठी वेतनवाढीच्या अनुषंगाने फरकासह सर्व आर्थिक फायदे अदा करण्यात यावे, अशा अनेक मागण्या संघाकडून वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, या मागण्यांकडे व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या सातत्याने होणाऱ्या हेळसांडीमुळे अपमानित होऊन टोकाचे कर्मचारी पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाले आहेत, असे संघाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.