प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला. त्यामुळे थंडीची लाट आणखीन तीव्र झाली आहे. शनिवारी (दि. १३) हवेली, बारामातीसह पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात कडाक्याच्या थंडी आणि दाट धुके होते. या परिसरात ७ ते ८ अंशाच्या आसपास किमान तापमान होते. दौंड, तळेगाव दाभाडे आणि आंबेगाव परिसरात ९ ते १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.मागील आठ दिवसांपासून शहरासह उपनगरात किमान तापमान ७ ते ८ अंशाच्या आसपास स्थिर असल्यामुळे कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले आहेत. विशेषत: शहराच्या पश्चिम भागातील पाषाण, एनडीए, वारजे, धायरी, नांदेड फाटा, आंबेगाव, जांभूळवाडी, कात्रज, हांडेवाडी यासह हवेली परिसरात थंडीची लाट अधिक आहे. हुडहुडी वाढल्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले आहेत. शहराच्या पूर्व भागात किमान तापमान १२ ते १५ अंशाच्या आसपास असल्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी आहे. पुणे जिल्ह्यातही थंडीची लाट कायम असून, बारामती जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पारा ७ अंशाच्या खाली नोंदविला गेला आहे. तसेच माळीण, दौंड, आंबेगाव आणि तळेगाव दाभाडे परिसरासह डोंगर भाग आणि धरणक्षेत्रात कडाक्याच्या थंडीने नागरिक चांगलेच गारठले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, पहाटे धुक्याचे प्रमाण वाढेल तर किमान तापमानात काही अंशी घट होणार असल्याने थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. आजचे तापमान पाषाण ८.३, शिवाजीनगर ८.८, कोरेगाव पार्क १३.३, चिंचवड १४.१, वडगावशेरी १५.३, मगरपट्टा १५.६, हवेली ७.१, बारामती ७.७, माळीण ८.५, दौंड ९.३, तळेगाव ९.४, आंबेगाव १०, निमगिरी ११.२, भोर १३.१