सोसायटीच्या नव्या सभासदांना प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी, एसीबी ने दोघांना पकडले पुणे – सोसायटीतील नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) देण्यासाठी आठ कोटींची मागणी करून ३० लाखांची लाच घेणाऱ्या प्रशासकासह अवसायाकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला असून प्रशासकाला शनिवार पेठेत सापळा लावून पकडले. याप्रकरणी विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. सिंहगड दर्शन सोसायटी, धायरी फाटा), भास्कर राजाराम पोळ (वय ५६, रा. सुश्रृत रेसीडन्सी, नऱ्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण धनकवडीतील एकता सहकारी सोसायटीचे असून तेथील नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्राची मागणी केली. फिर्यादी व्यावसायिक असून त्यांचे शनिवार पेठेत कार्यालय आहे. त्यांच्यासह एकता सोसायटीचे ३२ नवीन सभासद आहेत. जुन्या सभासदांकडून त्यांनी सोसायटीचे समभाग खरेदी केले होते. यावरुन जुन्या, नवीन सभासदात वाद झाल्याने हे प्रकरण सहकार विभागाकडे गेले. सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक झाल्यावर त्यांनी मूळ आणि नवीन सभासदांची चैाकशी करुन अहवाल सहकार विभागाकडे सादर केला. ३२ नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालिन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे अर्ज केला होता. समभाग प्रमाणपत्र देण्याची त्यांनी विनंती केली. पोळ यांनी फिर्यादींचा अर्ज प्रलंबित ठेवला. अन्य नवीन सभासदांचे अर्ज निकाली काढले. फिर्यादी उपलब्ध नसल्याने अर्ज प्रलंबित ठेवला. सप्टेंबर २०२५ मध्ये फिर्यादींनी पोळ यांची भेट घेतली. प्रमाणपत्राबाबत चौकशी केली. तेव्हा सर्व नव्या सभासदांच्या प्रमाणपत्रसाठी तीन कोटींची लाच मागितली. ही लाच पोळ यांनी आपल्यासाठी आणि सोसायटीचे अवसायक (लिक्विडेटर) विनोद देशमुख यांच्यासाठी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भविष्यात सोसायटीच्या लिलाव प्रक्रियेत फिर्यादी सांगतील, त्याला जागा मिळवून देऊ, असे सांगून पोळ याने आणखी पाच कोटींची लाच मागितली. लाचेच्या ३० लाखांचा पहिला हप्ता घेताना शनिवार पेठेतील कार्यालयाजवळ त्यांना अचक केली. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधिक्षक अजिय पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीता मिसाळ आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.