पुणे :मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला २१ कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठविली होती. कंपनीने बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितल्यानंतर नोंदणी-मुद्रांक विभागाने याची सुनावणी गुरुवारी (दि.४) ठेवली आहे. यावेळी अमेडिया काय दावे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंढवा जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणात पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया आणि जमिनीचे कुलमुखत्यारपत्र घेतलेल्या शीतल तेजवानी यांच्यात हा व्यवहार झाला आहे. बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात याची दस्त नोंदणी करताना अमेडियाने लेटर ऑफ इंटेट (इरादापत्र) दाखवून पाच टक्के मुद्रांक शुल्क माफी मिळविली होती. उर्वरित दोन टक्के मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना ती न भरता दस्त नोंदणी केली. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केले असून, कंपनी आणि तारू यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. कंपनीने मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी नोंदणी विभागाने २१ कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. दोन नोटीस बजाविल्यानंतर कंपनीने म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार या प्रकरणाची पहिली सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे. या सुनावणीत काय निर्णय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.