परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ पुणे – विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे दिल्ली, बंगळूरू, कोलकाता यासह अन्य राज्यात जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचा आधार घेतला. मात्र, आधीच रेल्वेला गर्दी त्यात महत्वाच्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे व्हेटींग लिस्ट वाढलेली आहे, अशा स्थितीत प्रवाशांना तिकिट बुकिंग मिळत नसल्यामुळे व्यावसायासह शिक्षण, प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. इंडिगो कंपनीची विमानसेवा मागील दहा दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे दररोज ३० ते ४० विमान उड्डाणे रद्द होत आहेत. त्यामुळे पर्यटन, शिक्षण, नोकरी, मुलाखती, व्यावसाय यासह विविध स्पर्धांसाठी बाहेगावी जाणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पुणे विमानतळावर रेल्वेकडून या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी पुण्यातून कोणती रेल्वे गाडी आहे, त्याचा वेळ काय याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यानुसार काही प्रवाशांकडून विविध राज्यात जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग करून प्रवास सुरू केला. तिकिट उपलब्ध असलेल्या गाड्या भरल्या. मात्र, महत्वाच्या मार्गावर दररोज धावणाऱ्या गाड्यांचे तिकिट बुकिंग १० ते १५ दिवसांपासून फुल्ल आहे. त्यामुळे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता कमीच. त्यात एक ते पाच दरम्यान व्हेटींग लिस्ट असलेल्या ठिकाणी एखाद-दुसरे तिकिट कन्फर्म होत आहे. त्यामुळे प्रवास करायचा की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत असून, मन:स्ताप अधिक वाढत आहे. दरम्यान, यावेळी पुणे-नागपूर वंदेभारतला प्रवाशांची मोठी गर्दी वाढल्याचे दिसून आले. खासगी बसेसने प्रवास… क्रीडा स्पर्धेसाठी दिल्लीला जाण्यासाठी इंडिगो विमानाचे तिकिट बुकिंग केले. मात्र, विमानसेवा रद्द झाल्याचे समजल्यावर तीन ते चार दिवस अधीच रेल्वेचे बुकिंग केले. मात्र, चार तिकिटांपैकी केवळ दोन तिकिट कन्फर्म झाले, गाडीला गर्दी आहे, त्यामुळे प्रवास करायचा कसा, असा प्रश्न पडला, अशी भावना एका प्रवाशाने व्यक्त केली. विमान रद्द झाल्याचे समजल्यावर आम्ही लगेच रेल्वेचे आॅनलाइन तिकिट पाहिले. तर, एकच तिकिट उपलब्ध होते आणि आम्ही चार जण होतो. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी बसने प्रवास करावा लागल्याचे एका प्रवासी महिलेने सांगितले.