रामनदी पात्रालगत बिबट्या असल्याची अफवा पुणे – एनडीए च्या जवळ बिबट्या असल्याचे उघड झालेले असताना आणि शहरात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत आधीच भीती पसरलेली आहे, अशांतच बिबट्या असल्याच्या अफवांना अक्षरश: ऊत आला हे. प्रत्यक्षात पेक्षा ए आय बिबट्याचा सध्या सोशल मीडियावर उच्छाद सुरू असून एआय निर्मित व्हिडिओ आणि छायाचित्रांमुळे वेगवेगळ्या भागातील नागरिक भयभीत होत आहेत. मंगळवारीही रामनदी पात्रालगत बिबट्या असल्याच्या अफवेने नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र, ही अफवा असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याठिकाणी बिबट्या असल्याबाबतचे वृत्त, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाचे पौड रेंजचे क्षेत्रीय कर्मचारी, वन संरक्षक अधिकारी (आरएफओ) प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखालील, रेस्क्यू सदस्य, स्थानिक प्रतिनिधी आणि सोसायटी सदस्यांनी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत ज्याठिकाणी बिबट्या असल्याची खबर मिळाली होती त्याठिकाणी पाहणी केली. त्यांच्यातर्फे त्या परिसरात आणि राम नदी पात्राच्या लगतच्या परिसरात गस्त आणि शोध मोहीम राबवण्यात आली. याठिकाणी बिबट्याची कोणतीही चिन्हे किंवा हालचाल दिसली नाही. तसेच, व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि छायाचित्राबाबतची सत्यता तपासण्यात आली. स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत पसरवण्यासाठी संपूर्ण परिसरात बनावट एआय फोटो आणि अफवा पसरवण्यात आल्याचे वनविभागाच्या निदर्शनाला आले, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वन विभागाने दिलेल्या एसओपीचे पालन करावे, अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.