पुणे – शहरावर धुळीची झालर पसरली असून, त्यामुळे श्वसनरोगाला निमंत्रण मिळत आहे. सर्दी, खोकला याशिवाय दमा, श्वास घेण्यात अडथळे असे रोग बळावले आहेत. सध्या शहरभर रस्त्याची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हवेत धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तापमान १४-१५ अंश सेल्सिअस असल्याने वातावरणात कमालीचा गारवा आहे. रात्री तो गारवा वाढत आहे. सायंकाळपासूनच धुक्याची चादर वातावरणात पसरत आहे. ही धूळ दुसऱ्यादिवशी सकाळी उशीरापर्यंत राहते. या धुक्यामध्येच धुळीकण अडकून हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ उडते आणि ती हवेत पसरते. ती वजनाने पुन्हा जमिनीवर येण्याऐवजी धुक्यांमध्ये अडकते. वाहनचालक, पादचारी यांच्या नाकातोंडात ही धूळ जाते. एवढेच नव्हे तर वातावरणातही मातकट वास राहतो. यामुळे श्वसनाचे विकार बळावत आहेत. यामध्ये दमेकरी आणि अन्य फुफ्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. हे धुलीकण नाकातोंडात जाऊन, सर्दी, खोकला, कफ असे प्रकार होत आहेत. हे धुलीकण वाहनांमुळे हवेत उडू नयेत म्हणून हवेत पाणी मारले जात आहेत. मात्र ते पुरेसे नाही. हवेतील प्रदूषण यामुळे अजिबातच कमी झाले नसून, शहरात जवळपास सर्वच भागात ही स्थिती आहे. ज्या ठिकाणी खाणी आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्यांचे काम सुरू आहे. तेथे धुलीकण निर्माण होऊन तेथील आजूबाजूच्या रहिवाशांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. धुळीच्या आवरणामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क लावूनच बाहेर पडावे असा सल्ला आरोग्यविभागाने दिला आहे.