प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील महायुती सरकारकडून चुकीच्या पद्धतीने योजना राबवून भ्रष्टाचार करीत मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात दोघांनीही विविध विषयांवर भाष्य केले. सत्ताधारी पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील उद्योग पुणे सोडून बाहेत जात असून, नवीन गुंतवणूक शहरात येत नाही. राज्य सरकारकडून मोठमोठ्या गुंतवणूक घोषणांचा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस गुंतवणूक दिसून येत नाही. नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे अत्याधुनिक उद्योग पुण्यात येत नाहीत. काँग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे अभिवचन देत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.स्वत: मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला होता व त्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे श्रेयवाद करू नये. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, मात्र चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करीत आहेत, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. स्मार्ट सिटी योजना भाजपाने गुंडाळली असून, शहराची शैक्षणिक व औद्योगिक ओळख धोक्यात आली आहे. जैवविविधतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टेकड्या नष्ट होत असून, सत्तेत आल्यावर या विषयावर गांभीर्याने काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे अनेक गैरप्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले.पुणे फर्स्ट हेच प्रमुख ध्येय राहणार आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर युती सरकार अपयशी ठरले आहे. भाजप जाहीरनाम्यात केवळ घोषणा करीत असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. शहरात कोयता गँग वाढत असून कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. भाजप गेली पाच वर्षे सत्तेत होती, त्यांनी काय केले याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप म्हणजे पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका त्यांनी केली.