पुणे : प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेला गेल्या सात वर्षांपासून आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात प्रभागासाठी आरोग्य सेवा सक्षम करता आली. तसेच भविष्यात आणखी लोकाभिमुख करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही प्रभाग २२ (क)च्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी दिली. ही कामेच आपली ओळख असून, नागरिक पुन्हा आपल्यालाच संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाटील यांनी प्रभागातील पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मतदारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाल्या की, आपल्या कामाचा ठळक पैलू म्हणजे सोनावणे हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील पहिला ‘बर्न आणि स्ट्रोक वॉर्ड’ सुरू असलेले काम आहे. याच ठिकाणी हॉस्पिटलमधील नर्सिंग क्वॉर्टर्सची अवस्था अत्यंत खराब झाल्याने परिचारिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या क्वॉर्टर्सची संपूर्ण दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रभागातील नागरिकांसाठी गेल्या सात वर्षांपासून प्रभागात चोवीस तास मोफत रुग्णवाहिका सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांसाठी सलग ७२ दिवस मोफत अन्नछत्र चालवण्यात आले. यासोबतच प्रभागात नियमित सॅनिटायझेशनची मोहीम राबविण्यात आली. प्रभागातील सुमारे सात हजार नागरिकांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले याचा विशेष आनंद असल्याचेही पाटील मतदारांशी बोलताना म्हणाल्या.