पुणे : प्रभागात पायाभूत सुविधांसोबतच भविष्यातील चांगली पिढी घडविण्यासाठी शाळा, तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्यास प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) च्या भाजप उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी दिली. पाटील यांनी प्रभागात पदयात्रेत मतदारांशी संवाद साधला, या वेळी महापालिकांच्या शाळांसाठी केलेल्या कामगिरीचा आलेख नागरिकांसमोर मांडला. नागरिकांशी संवाद साधताना पाटील म्हणाल्या, की माझा भर हा केवळ तात्पुरत्या समस्या सोडविण्यावर नसून, येथील मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यावर आहे. याच दूरदृष्टीतून त्यांनी प्रभागात सावित्रीबाई फुले प्रशालेत अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त अशी नवीन ‘ई-लर्निंग’ शाळेची इमारत उभारली आहे. यामुळे प्रभागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणे शक्य झाले आहे. केवळ इमारती उभारून न थांबता, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, यासाठी पाटील यांच्या वतीने प्रभागातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना गेल्या आठ वर्षांपासून नियमित मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहावे, यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्रात लहान मुलांसाठी मोफत (शिकवणी) वर्ग चालवले जातात, ज्याचा लाभ अनेक गरजू कुटुंबांना होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.