PMPML News – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मध्ये आवश्यक शैक्षणिक व सेवा पात्रता नसतानाही ठराविक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व पदोन्नत्यांचा आदेश ३१ जानेवारीला पुणे महापालिकेची आचारसंहिता असताना काढल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी. चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत पदोन्नत्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनीही निवेदन दिले आहे. सध्या पीएमच्या मालकीच्या ६९० बसेस असून, त्यातील २०० बस बंद आहेत, तर अन्य बस मार्गांवर धावतात. पीएमपीएमएल कंपनीला संचलनातील तुटीसाठी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकासह पीएमआरडीएकडून निधी दिला जातो. त्यामुळे जी संस्था इतर संस्थांच्या आर्थिक मदतीवर चालू आहे, त्या संस्थेमध्ये केसकर यांनी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी बेकायदा बढत्या केल्याचा आरोप केला आहे.ते म्हणाले, १९८ कंडक्टर आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना क्लार्कचे प्रमोशन दिले आहे. २६ स्टँड मॅनेजर म्हणून नियुक्ती दिली. कायम कंडक्टर, कायम क्लिनर, शिपाई, झाडूवाला, ड्रायव्हर या हुद्द्यावरील सेवकांना क्लार्क केले. पीएमपीएल सीनियर फोरमन पदावर आठ जणांना पदोन्नती दिली. जे क्लिनर म्हणून काम करत होते. कंडक्टर प्रवर्गातील कर्मचाऱ्याची नेमणूक काॅम्प्युटर प्रोग्रामर या जागेवर केली. त्याहीपेक्षा या पदोन्नत्यांचा आदेश आचारसंहितेत काढला आहे. सध्या पीएमपीचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे असून, त्यांनी याची चौकशी करावी. दोषींवर कारवाई करा पीएमपीमध्ये शैक्षणिक व सेवा पात्रता नसतानाही ठराविक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिवसेनेने प्रथम उघडकीस आणला होता. याप्रकरणी निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले. त्रिस्तरीय समिती पीएमपीतील बेकायदा बढती प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी. पी. यांनी त्रिस्तरीय समिती स्थापन केली असून, त्यामध्ये पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक ऍलिस पोरे, पुणे महापालिका सामान्य प्रशासनाचे उपायुक्त विजय थोरात सदस्य तर मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक सुरेश खेडकर सदस्य सचिव म्हणून समावेश आहे. पुढील १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.