प्रभात वृत्तसेवा पुणे – निकालाच्या दिवशी विजयाच्या मिरवणुकीला परवानगी नसल्याने जिंकलेल्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह पक्ष निवडणूक कार्यालयाच्या बाहेर गुलाल उधळून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी पक्षाचा झेंडा फडकवून तसेच गुलाल उघळून आनंद साजरा केला. मतमोजणी केंद्रांच्या बाहेरच कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळायला सुरूवात केली. उमेदवारांना खांद्यावर उचलूत त्यांना गुलालाने माखले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तात्पुरत्या उभारलेल्या पक्षाच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेर जल्लोष केला.विजयानंतर ठिकठिकाणी मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मतदान केंद्राच्या बाहेर अनेक कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. निकालानंतर केंद्राच्या बाहेरच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, जल्लोष करण्याला सुरूवात केली. जल्लोष करत रस्त्यावरून गाड्यांवरून रॅली काढत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलीसांनी जप्त केल्या. निकालाच्या दिवशी विजयी मिरवणूक काढण्याला परवानगी नसतानाही उत्साही कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर स्टंटबाजी केली.त्यांना पोलीसांनी चांगलीच चपराक दिली.आणखी एका घटनेत बावधनमध्ये गुलाल उधळताना गुलालाने पेट घेतला. यामध्ये पाच ते सहा कार्यकर्ते भाजल्याचा प्रकार घडला. निकालानंतर धक्का बसलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.अपेक्षित यश मिळाले नाही आणि दिग्गजांना घरी बसावे लागले म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचा शहरात एकप्रकारे सुपडा साफ झाल्याने त्या कार्यकर्त्यांनी घरीच राहणे पसंत केले. या दोन्ही कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या आधीच्या आणि निवडणुकीच्या काळात प्रचंड रेलचेल होती.अजित पवार यांनी तर पुण्यातच ठिय्या मारून रणनिती आखली होती. मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने पक्षात नाराजी पसरली होती.दुसऱ्या बाजूला भाजप कार्यालयासमोर मात्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते.