प्रभात वृत्तसेवा पुणे : मतदारयादीतील मतदार पळवापळवीचे आरोप राज्यभर सतत होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. मतदारयाद्यांच्या विभाजनात कोणत्याही प्रकारच्या चुका आढळल्यास त्या आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन दुरुस्त कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेने सर्व प्रकारच्या तक्रारी स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगाकडून हरकती आणि सूचनांसाठी मुदतवाढ दिल्याने ३ डिसेंबरपर्यंत अधिकाधिक मतदारांनी, नागरिकांनी हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या निवडणूक विभागाने केले आहे.आगामी महापालिका निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने क्षेत्रीय कार्यालयांच्या मदतीने मतदारयादीचे विभाजन करत प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांवर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असून अनेक प्रभागांमध्ये मतदार पळविल्याच्या किंवा दुसऱ्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात आल्याच्या तक्रारी इच्छूक करत आहेत. आयोगाच्या आधीच्या सूचनेनुसार केवळ नाव नसणे, नाव दुसऱ्या प्रभागात जाणे, सोसायटीत मतदारांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, अशाच तक्रारी स्वीकारल्या जात होत्या. त्यामुळे स्पष्टपणे चुकीची नोंद दिसत असूनही इच्छुकांनीना अनेक तक्रारी नोंदविणे कठीण झाले होते. राज्यातून आलेल्या तक्रारींचा आढावा घेत आयोगाने आता अशा स्वरूपाच्या सर्व तक्रारी महापालिका आयुक्तांच्या पातळीवरच निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महापालिकेला अशी माहिती मिळाल्यास २४ तासांच्या आत नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार महापालिकेने आता सर्व प्रकारच्या हरकती, सुचनांची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. आता यावरही होणार विचार – लेखनिकांच्या चुकांमुळे झालेल्या त्रुटी – दुसऱ्या प्रभागातील मतदाराचा समावेश – विधानसभा यादीत असलेले नाव वगळल्यास समावेश करणे – मृत व्यक्तींच्या नावांबाबतच्या हरकती ८० टक्के हरकती निकाली हरकती आणि सूचनांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आयोगाच्या आदेशांनुसार महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांतील २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आतापर्यंत ८० टक्के हरकती निकाली काढून आवश्यक दुरुस्त्या केल्या असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. तसेच तक्रारींची आणि केलेल्या दुरुस्त्यांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या तिन्ही अतिरिक्त आयुक्त गेल्या दोन दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देत आहेत.