PMC News – समाविष्ट गावांमधील गृहनिर्माण सोसायट्यांना तीन वर्षे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित विकसकाचीच असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी बुधवारी स्पष्ट केले. बांधकाम परवानगी देतानाच या गोष्टी स्पष्ट करून तसे लेखी हमीपत्र घेतले जाते. त्या आधारेच पूर्णत्त्वाचा दाखलाही दिला जातो, हे देखील राम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाणीपुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेवर टाकता येणार नाही, हे देखील राम यांनी सांगितले. पाणी पुरवठ्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समाविष्ट गावांतील सोसायट्यांचे सविस्तर सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. कोणत्या सोसायट्यांना पालिका आणि कोणत्या ठिकाणी विकसक पाणी पुरवणार याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्याबाबतच्या जबाबदाऱ्या निश्चित होतील असेही आयुक्तांनी सांगितले. हमीपत्र देतानाही विकसकांनी अनेक पळवाटा काढल्या आहेत. त्यामुळे ते जबाबदारी झटकत आहेत. हमीपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर पालिकेने लक्ष केंद्रीत केले असून, पुढील वर्षात सात गावांना थेट पालिका पाणी पुरविणार असल्याचे आयुक्त म्हणाले. पालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असले, तरी त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने झालेली नाही. ८२ टाक्यांपैकी ४४ टाक्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जातो. पाइपलाइनचे जाळे अपूर्ण असल्याने केवळ पाच ते सात टाक्यांमधूनच पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचा आढावा घेऊन जुलै किंवा ऑगस्टपर्यंत १०० टक्के अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याबाबत मुख्यसभेतही चर्चा झाली होती. “पाण्याबाबतच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत प्रभागनिहाय माहिती घेतली जात आहे. समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन जुलैअखेर ती पूर्ण क्षमतेने राबवली जाईल.” – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका