PMC News – महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना असलेले मर्यादित अधिकार तसेच नागरिकांच्या सुरक्षा तपासणीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने महापालिकेत सुरक्षा व्यवस्थेचा पुरता गोंधळ उडाला आहे. महापालिकेत नव्याने नगरसेवक तसेच त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे शस्त्र परवाना असल्याने अनेक जण या शस्त्रांसह महापालिकेत येत आहेत. मात्र, सुरक्षा रक्षकांना त्यांना अडविण्याचा अथवा तपासणी करण्याचा अधिकार नसल्याने त्यांना अडविता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आवारात सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच, कर विभागाच्या कार्यालयात एक नागरिक पिस्तूल घेऊन पोहचल्याने महापालिकेत सुरक्षा व्यवस्थाच नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गर्दी नियंत्रणाच्या बाहेर महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यातच, आता महापौरांसह समित्यांच्या निवडी आणि नियमित मुख्यसभा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ६० टक्के पेक्षा अधिक आहे. त्यातच, त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी असून नगरसेवक कोण आणि कार्यकर्ते कोण हेच प्रशासनास लक्षात येत नाही. परिणामी, अनेक जण नगरसेवकांच्या सोबतच सभागृहात जात आहेत. तर, त्यांच्यासोबत जात असताना सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यास वाद घालत आहेत. तर, महापालिकेच्या मुख्य सभागृहाच्या प्रेक्षागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते नगरसेवकांच्या समवेत येत असल्याने प्रेक्षक गॅलरीत मोठी गर्दी होत आहे. सुरक्षा तपासणीच नाही महापालिकेकडून नगरसेवक वगळता इतर नागरिकांना जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात आहे. मात्र, तिथून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही तपासणी होत नाही. पालिकेने नागरिकांनी आणलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी स्कॅनर बसविले आहेत. पण, ते बसविल्यापासून बंदच आहेत. तर मुख्य इमारत अथवा कुठल्या भागात मेटल डिटेक्टर अथवा कोणतीही तपासणी साधने नाहीत. त्यामुळेच मिळकतकर विभागात एक व्यक्ती थेट शस्त्र घेऊन गेला होता. या व्यक्तीची सुरक्षा तपासणी झाली असती तर हा प्रकारच घडला नसता. सभागृहातही शस्त्र आणल्याची चर्चा महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची संख्या अधिक आहेत. त्यात, काही समाविष्ट गावांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांचाही समावेश असून, त्यातील अनेक नगरसेवकांनी त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षेसाठी शस्त्र परवाना घेतल्याची चर्चा आहे. यातील सदस्यांकडूनही सभागृहात शस्त्र आणल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वर्तुळात आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत शस्त्र घेऊन येण्यास बंदी आहे. मात्र, नियम माहिती नसल्याने ते आणले असतील अशीही चर्चा रंगली आहे.