PMC News – राजकारणात महिलांनाही समान संधी मिळावी, या उद्देशाने महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या जागांवर महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे ८३ जागा राखीव असलेल्या महापालिकेत तब्बल ८८ महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. मात्र, महिला नगरसेविकांनी अद्याप महापालिकेची पायरीही चढली नसलेली, तरी नगरसेविकांच्या पतीने महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप सुरू करण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील एका नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीने स्वच्छतेसंदर्भातील आढावा बैठकीत थेट हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नगरसेविका केवळ नामधारी आणि प्रत्यक्ष कारभार पतींच्या हाती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर स्वच्छतेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, या संपूर्ण बैठकीदरम्यान नगरसेविका शांतच राहिल्या. त्यांच्या पतींनीच बैठकीत पुढाकार घेत स्वच्छतेच्या कामकाजावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला, तसेच या भागातील स्वच्छतेची माहिती दररोज मिळावी, असे सुनावले. या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे महिला नगरसेविकांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळणार, की सत्तेच्या आडून पतीच कारभार चालवणार? तसेच महिला नगरसेविकांना कामाची संधी मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.