प्रभात वृत्तसेवा पुणे – मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला हात पुढे करीत तब्बल २ कोटी ७७ लाख ३७४ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी म्हणून जमा करण्यात आला आहे. ऑक्टोबर (पेड इन नोव्हेंबर) महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने सर्व शासकीय अधिकारी–कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देणगी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे महापालिका तसेच शिक्षण विभागातील अधिकारी–कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून निधी जमा करण्यात आल्याचे प्रशासनाने परिपत्रकाद्वारे कळविले होते. त्याला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशासनाकडून आभार मानण्यात आले.