प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यात १५ कोटींचा खर्च केला आहे. या महिन्यात विविध रस्त्यांवर एकूण २,९८९ वेगवेगळे (आयसोलेटेड) खड्डे बुजवले असून, रस्ते खरवडून १८०० ठिकाणी एकूण १ लाख ८८ हजार ९४८ चौरस मीटर म्हणजेच १८ हेक्टर रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा पालिकेने केला आहे. पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत पत्रकारांना ही माहिती दिली. त्यानंतरही अद्याप शहरात अनेक ठिकाणी खड्डे असून, या मोहिमेत ७५ टक्के कामे झाल्याचा दावाही पावसकर यांनी केला आहे. पावसकर म्हणाले की, खड्डेमुक्तीसाठी पालिकेने सर्व विभागांतील ठेकेदार, मुख्य खात्यातील अभियंते, उपअभियंता, कनिष्ठ अभियंते यांची स्वतंत्र टीम तयार करून युद्धपातळीवर काम सुरू केले. गेल्या ३० दिवसांत रस्त्यांवरील तातडीच्या दुरुस्तीचे कामे सर्वाधिक वेगाने केली आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर एकूण २,९८९ वेगवेगळे (आयसोलेटेड) खड्डे बुजवले. हे असे खड्डे होते की, रस्ता एकूण चांगल्या स्थितीत असूनही काही ठिकाणी खोल किंवा धोकादायक खड्डे निर्माण झाले होते. काही रस्त्यांवर सलगपणे मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने केवळ खड्डे बुजवून समाधान होत नव्हते. अशा ठिकाणी संपूर्ण रस्त्याचे मिलिंग करून डांबरीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. विना निविदा केली कामे या कामासाठी मोहिमेत १५ कोटी रुपये खर्च आल्याचेही पावसकर यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सरासरी प्रत्येकी एक कोटी रुपये या कामांसाठी वितरित केले. या निधीतून ही कामे केली असून, त्यासाठी पथ विभागाने या पूर्वीच्या ठेकेदारांची नियुक्ती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालये विभागून दिली होती. या पुढेही हे काम नियमित चालू ठेवले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.