PMC Exam Postponed – आधी लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि महिन्यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आलेली महापालिकेतील १६९ जागांसाठीची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या रविवारी (दि. २५) होणार होती. मात्र, या परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत गुरुवारी रात्री महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर अखेर महापालिकेने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली आहे.या परीक्षेसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क भरून सुमारे ४२ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, हॉल तिकीट मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील खासगी (प्रायव्हेट) परीक्षा केंद्रे देण्यात आल्याचे समोर आले आहे. सांगलीतील उमेदवाराला लातूर, लातूरच्या उमेदवाराला कोल्हापूर, नाशिकच्या उमेदवाराला जळगाव, तर कोल्हापूरच्या उमेदवाराला अमरावतीसारख्या दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा आरोप अर्ज केलेल्या उमेदवारांनी करीत महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी अचानक तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून, परीक्षेची तारीख पुढील काही दिवसांत कळविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.