प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करणार की हे उद्या स्पष्ट होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शुक्रवारी (दि. १९) शहरातील सर्व नेत्यांच्या, इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात या निवडणूका महाविकास आघाडीत लढण्याचे सांगत राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या सोबत चर्चा सुरू करण्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काढले होते. त्यानंतर लगेचच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चेला जोर आला. तर, दोन दिवसांपूर्वी पुण्यात बैठकांसाठी आलेल्या अजित पवारांची भेट घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष भेटीसाठी गेले होते. त्यामुळे या चर्चेला आणखी जोर आला. त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष पुण्यात इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार ही बैठक सकाळी पक्ष कार्यालयात होणार आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी सोबत जाणार की राष्ट्रवादी सोबत हे स्पष्ट होणार आहे.