प्रभात वृत्तसेवा पुणे – अगामी पुणे महापालिका निवडणुकीला आपण एकत्र लढायचे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेलो सैनिक आहोत. त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवत महापालिकेवर पुन्हा विजय मिळवायचा, असा निश्चय पुणे शहर शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करीत, जे आपल्याबरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जायचे असेही एकमताने ठरल्याचे शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाची डेक्कन येथील शिवसेना भवन याठिकाणी रविवारी (दि. १४) बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक व समन्वयक वसंत मोरे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, संजय भोसले, अशोक हरणावळ, रामभाऊ पारीख उपस्थित होते. तर मनसेचे नेते बाबू वागसकर, शहरप्रमुख साईनाथ बाबर, बाळा शेडगे, ॲड. किशोर शिंदे, हेमंत संभूस, अजय शिंदे, योगेश खैरे आदी उपस्थित होते.शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले असून, याची प्रचिती शिवसेना भवन येथील बैठकीला सैनिकांनी केलेल्या गर्दीवरून समजते. दुपारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पुणे महापालिका निवडणुक एकजुटीने लढायची, असा निर्धार करण्यात आला. मागील दोन निवडणुकांमध्ये कोणाच्या किती जागा निवडून आल्या. दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला याची माहिती घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व जागा लढविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना भवन येथील बैठकीनंतर आता येत्या मंगळवारी (दि. १६) शिवसेनेचे पदाधिकारी मनसे कार्यालयात जाऊन बैठक घेणार आहेत. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.