प्रभात वृत्तसेवा पुणे – आरपीआयला राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटणीत मिळालेल्या आठ जागांपैकी चार जागांवर अजित पवार यांनी स्वत:च उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचेच नाही, असे आरपीआय शहराध्यक्ष सचिन खरात यांनी ठणकावून सांगितले. असे असताना आरपीआय उमेदवाराला दिलेले घड्याळाचे चिन्ह काढून घेणार का, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना विचारला आहे. मंत्री मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रसिद्धी विभागातील अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.तुम्ही गुन्हेगारांना उमेदवारी कशी दिली, हे पवार यांना पत्रकारांनी विचारले, त्या वेळी त्यांनी शेजारच्या मित्रपक्षाकडे बोट दाखवले आणि आरपीआयच्या सचिन खरात यांनी उमेदवार दिल्याचे सांगितले. मात्र, खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आपले उमेदवार नाहीत, असा खुलासा करत निवडणुकीतून माघार घेतली. मग त्या चार- पाच उमेदवारांकडून त्यांचे चिन्ह काढून घेणार का, ते आमचे उमेदवार नाहीत हे जाहीर करणार का, असा प्रश्न मोहोळ यांनी विचारला आहे. पुण्यात कोयता गँग वगैरे मला चालणार नाही, असा दम आमचे पालकमंत्री एका कार्यक्रमात पोलीस आयुक्तांना देतात. दुसरीकडे त्यांच्या उमेदवारांच्या यादीत अशी नावे येतात. हे पाहिल्यावर ते बोलतात एक आणि करतात एक, असे दिसते. ही चिंतेची बाब असून, आता गुन्हा केला की नगरसेवक होता येते, हा संदेश उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे की काय, हे मला समजत नाही, असे मोहोळ म्हणाले. आमच्या १२० जागा निवडून येतील. महापौरही आमचाच होईल. माझ्या पक्षात एकही बंडखोरी झाली नाही. जे लढत आहेत, ते पक्ष सोडून गेले आहेत. त्यांना आम्ही रामराम केला आहे, असा दावा मोहोळ यांनी केला आहे. सिद्ध करून दाखवा… माझ्या आणि महेश लांडगे यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आरोप- प्रत्यारोपात खालच्या स्तरावर पुण्याची निवडणूक जाईल, असे वाटले नव्हते. मात्र, पालकमंत्री आमच्यावर जे आरोप करत आहेत, ते वास्तविक त्यांनाच लागू होतात. गुंड नीलेश घायवळला परदेशात जाण्यासाठी मदत मी केली, असा आरोप अजित पवार यांनी केला. त्या वेळी हे सिद्ध करून दाखवा. जर तसे असेल, तर मी राजकारण सोडेन आणि तसे नसेल तर तुम्ही राजकारण सोडा, असे आव्हान मी त्यांना त्याही वेळेला दिले होते, असे मोहोळ यांनी सांगितले.