प्रभात वृत्तसेवा पुणे – शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका. विधानसभेला परिवर्तन घडवले, तेच परिवर्तन आता लाडक्या बहिणी महापालिकेतही घडवतील आणि विरोधकांना कात्रजचा घाट दाखवतील, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पुण्यात व्यक्त केला. पुणे गुन्हेगारीमुक्त, गुंडगिरीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिंदे यांनी पुणेकरांना केले. पुणे शहरातील कात्रज आणि नाना पेठेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या. या वेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार तानाजी सावंत, माजी आमदार व महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, अजय भोसले, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, आबा बागुल, नमेश बाबर यासह उमेदवार उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षाचा ‘शब्द शिवसेनेचा’ या वाचनानाम्याचे प्रकाशन करण्यात आले.महापालिका निवडणुकीची लढाई धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची असून, असा परिस्थितीत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणारी ही शिवसेना नाही. मी जेथे-जेथे सभेला जातो तेथे लाडक्या बहिणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. येत्या १५ तारखेला मतदान नव्हे, तर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. मी मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजना, महिलांना राज्य परिवहन बसमध्ये ५० टक्के सूट, मुलींना मोफत शिक्षण युवकांना रोजगार आदी आहेत. या वेळी शिवसेना स्वबळावर लढत असून, आपला अजेंडा हा पुण्याचा विकास व लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे. शहरातील वाड्यांचा विकास, म्हाडातून सर्वसामान्यांना घरे द्यायची आहेत. शिवसेना किंगमेकर ठरेल शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. गाडीवर भ्याड हल्ला करून पळून जाऊ नका. हिंमत असेल, तर समोर येऊन लढाई करा. कोविड, महापूर, आपत्तीत लोकांना मदत करतात. मी आधी अनेक ऑपरेशन केले आहेत. कोणाची सर्जरी करायची व कोणाला गोळी द्यायची, हे चांगले माहिती आहे. शिवसेना महापालिका निवडणुकीत किंगमेकर ठरेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वेळी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेचा जाहीरनाम्याचे वाचन केले, तर सामंत यांनी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातून गुन्हेगारी, पब संस्कृती बंद झाली पाहिजे, असे सांगितले.