प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेत सत्तेत आल्यानंतर स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रभागातच जनता दरबार आयोजित केला जाईल, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट)चे काॅंग्रेसचे अधिकृत उमेवार अविनाश बागवे यांनी केली. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) येथे आयोजित पदयात्रेदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली. काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख यांनी या पदयात्रेद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. पदयात्रेची सुरुवात पूना कॉलेज, चुडामन तालीम येथून करण्यात आली. त्यानंतर मदिना हॉटेल, उर्दू अध्यापक विद्यालय परिसर असा मार्ग पार करीत सायंकाळी रामोशी गेट ते भवानी पेठमार्गे मोटार स्टँड येथे पदयात्रेचा समारोप झाला. या दरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, घरकुल प्रश्न, वाहतूक कोंडी या समस्या मांडल्या. यावेळी प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अविनाश बागवे यांनी सांगितले. या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरिफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे यांच्यासह काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.