प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाली आहे. ही आचारसंहिता केवळ महानगरपालिका हद्दीसाठी लागू आहे. मात्र, जिल्हा परिषद हद्दीमध्ये म्हणजेच ग्रामीण भागात ही आचारसंहिता लागू नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद हद्दीत नवीन विकास कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका पाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे नवीन विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करता येणार नाही. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अजूनही जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे ही आचारसंहिता जिल्हा परिषद हद्दीमध्ये लागू आहे का, याबाबत विचारणा होत होती. त्यावर जिल्हा प्रशासनाकडून ही आचारसंहिता केवळ पालिका हद्दीमध्येच लागू असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागात विकासकामांना गती आली असून, आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचे टेंडर काढणे, वर्क आॉर्डर देणे, भूमिपूजन करणे आदीं कामे करता येणार आहे.