प्रभात वृत्तसेवा पुणे : भाजपची घोडदौड रोखण्यासाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी काॅग्रेससोबत चर्चा सुरू करावी असे आदेश राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यानुसार, तातडीने बैठका घेऊन जागा वाटप तसेच राजकीय समीकरणावर चर्चा करून उद्या ( बुधवारी) दुपारपर्यंत जागा वाटपाची स्थिती कळविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि काॅग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.दोन दिवसांपूर्वी राशपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पुण्यात पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार की याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यातच, रविवारी राज्यातील नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे दिसले. त्यामुळे, महापालिकांमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र लढावे, असा निष्कर्ष काढण्यात आला. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर फेरविचार करण्याची मागणी केली. मात्र, पक्षाकडून पदाधिकाऱ्यांची समजूत काढत पुण्यात जावून राष्ट्रवादी, काॅग्रेस सोबत तातडीनं चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. निर्णय वरिष्ठांचा – शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असली तरी आम्ही राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे त्या दोन पक्षांचा निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून आमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनाही या आघाडीबाबत सावध भूमिका घेत आहे. त्याचवेळी मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत उद्या ( मंगळवारी) मुंबईत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मनसे पुण्यात महाविकास आघाडीत येणार की नाही याबाबतही राजकीय चर्चा होत आहे. काॅग्रेसला हव्या सन्मानपूर्वक जागा दोन्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्यास काॅग्रेसच्या प्रवेश नेत्यांनीही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार, ही बैठक तातडीनं होणार आहे. मात्र, या बैठकीत काॅग्रेसला सन्मानपूर्वक जागा हव्या आहेत.दोन्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा होणार असली तरी आमच्याकडून निवडून येणाऱ्या जागांची माहिती दिली जाणार आहे.पक्षाला सन्मापूर्वक जागा मिळाल्या तरच आघाडीबाबत विचार करणार होणार असल्याचे काॅंग्रेसने स्पष्ट केले.