प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बावधन-कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग १०, ११ आणि ३१ मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकूण जवळपास ४२ टक्के एवढे मतदान झाले. तर सायंकाळपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान पार पडले. त्यामध्ये प्रभाग १० मध्ये ५५, प्रभाग ११ मध्ये ५७ टक्के तर प्रभाग ३१ मध्ये ५२ टक्के अंदाजे मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मशिनचे बटन खराब असणे, मशिन क्रमानुसार न बसविणे यांसह किरकोळ वादविवादाच्या घटना सोडल्या तर तीनही प्रभागात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, काही प्रभागातील सायंकाळी पाचनंतर मतदारांची मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. बावधन-कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १० बावधन-भुसारी काॅलनी, प्रभाग क्रमांक ११ रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर आणि प्रभाग क्रमांक ३१ मयूर काॅलनी-कोथरूड या तीन प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागात भाजपचे वर्चस्व असून, केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि राज्यसभा खासदार अशी त्रिशक्ती असलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे शहरासह राज्याचे या प्रभागाकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग १० मध्ये एकूण मतदार संख्या ८० हजार ७३७ इतकी आहे. त्यामध्ये ४२ हजार ८२ पुरुष, ३८ हजार ६४९ स्त्री तर इतर ६ मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी कमी असल्यामुळे पहिल्या दोन तासांत (सकाळी साडेसात ते साडेनऊ) केवळ ८ टक्के मतदान झाले. साडेनऊ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे सकाळी साडेअकरापर्यंत ११ टक्क्यांनी मतदान वाढलले. तर साडेअकरा ते दीड वाजेदरम्यान ११ टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे सकाळी साडेसात ते दीड वाजेदरम्यान ३१ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी साडेतीनपर्यंत ४१ टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभाग ११ मध्ये एकूण मतदार संख्या ७१ हजार १९७ इतकी आहे. त्यामध्ये ३६ हजार ७९० पुरुष, ३४ हजार ४०१ स्त्री तर इतर ६ मतदारांचा समावेश आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यावर पहिल्या दोन तासांत ८ टक्के, त्यानंतर मतदानाची टक्के वाढत गेली. दुपारी दीड वाजेदरम्यान एकूण ३१ टक्के मतदान झाले. तर साडेतीन वाजता ४१ टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभाग ३१ मध्ये एकूण मतदार संख्या ७९ हजार ८२७ इतकी आहे. त्यामध्ये ४० हजार २५९ पुरुष, ३९ हजार ५६६ स्त्री तर इतर २ मतदारांचा समावेश आहे. या प्रभागात सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यानंतर प्रत्येक दोन तासांत ११ ते १२ टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी वाढत होती. दुपारी साडेतीनपर्यंत ४२ टक्के नोंद झाली.