प्रभात वृत्तसेवा पुणे – गावांसह सोसायटीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. मात्र, विस्कळीत नियोजनामुळे मागील अनेक वर्षांपासून बावधनकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या बावधन परिसराला टँकरमुक्त करण्याचा मानस आहे. योग्य नियोजन, लोकसंख्यावाढीचा विचार करून नवीन जलवाहिन्या टाकणे आणि साठवण टाक्यांची क्षमता वाढवून बावधनकरांना मुबलक पाणीपुरवठा करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बावधनकरांना दिले.प्रभाग १० बावधन-भुसारी काॅलनीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत दगडेपाटील, जयश्री गजानन मारणे, सुजाता सूर्यकांत भुंडे, शंकर केमसे यांनी बावधन गावासह सोसायट्यांमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. या वेळी आमदार शंकर मांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेत ग्रामस्थांसह सोसायटीतील नागरिकांसह महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या. गाव शहरात आले, तरी विकासाला बसलेली खीळ निघेना, अशी व्यथा नागरिकांनी मांडली. त्यावर मांडेकर यांनी राष्ट्रवादीला संधी द्या, बावधनच्या विकासाला गती नक्कीच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पिण्याच्या पाण्यासह रस्ते, ड्रेनेज लाइन, पावसाळी लाइन, पादचारी मार्ग, पथदिव्यांची कामे नियोजनबद्ध आणि तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करणार. विशेषत: वर्षानुवर्षे धूळखात पडलेली मैदाने मुलांसाठी खुली करू, असे अश्वासन उमेदवारांनी दिले. पदयात्रेत महिलांसह तरुणांची मोठी गर्दी होती.