प्रभात वृत्तसेवा पुणे – वनाजपर्यंत आलेली मेट्रो चांदणी चौकापर्यंत पोहोचली. आता ती हिंजवडी, बाणेरला जोडण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. चांदणी चौकात पादचारी पुलाचे काम अंतिम टप्यात आले असून, सुसज्ज आणि स्वच्छ रस्ते, मुबलक पाणीपुरवठा हीच प्रभागाची ओळख असेल. सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने पुढील पन्नास वर्षांचा विचार करून ड्रेनेज, पावसाळी लाइन, वीज आणि पाणीपुरवठा आदी नियोजनबद्ध विकासकामांना गती देण्यात येईल, असा विश्वास प्रभाग १० मधील भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांना दिला.भुसारी काॅलनी-बावधन प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार किरण दगडे-पाटील, रुपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी विविध सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. भविष्यात कोणती कामे प्राधान्याने करावीत, याबाबतही सूचना केल्या. आशिष गार्डन परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक कोंडी सुटली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी किरण दगडे, रूपाली पवार, अल्पना वरपे आणि दिलीप वेडेपाटील यांनी प्रभागातील शांतिबन, मैत्रेय बाग, इंद्रायणी, चिंतामणी, साई गणेश, डावी भुसारी कॉलनीतील दत्त मंदिर परिसर, सृष्टी, गुरुगणेशनगर, गुलमोहर आदी सोसायट्यांना भेटी दिल्या. त्या वेळी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या. त्या वेळी नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेत शांतिबन चौकात असलेले पीएमपीएमएल सर्व्हिस आणि पार्किंग सेंटर नव्याने उपलब्ध झालेल्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल. नागरिकांसाठी उपयुक्त उद्यान विकसित करण्याचा मानस असल्याचे उमेदवारांनी सांगितले.