पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांनी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास, सहकार्य आणि आपुलकी हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले. प्रचार पदयात्रेला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. याप्रसंगी नागरिकांनी आपल्या समस्या, अपेक्षा व सूचना मांडल्या. शेट्टी यांनी प्रभागातील क्वार्टरगेट परिसर, राजेवाडी समोरील भाग, छत्रपती शिवाजी स्टेडियम, कमला नेहरू हाॅस्पिटल, गवळीवाडा, मंगलमित्र मंडळ परिसरात पदयात्रा काढत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले. या वेळी प्रभागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही मांडला. पदयात्रेदरम्यान, प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. नागरिकांच्या प्रश्नांवर नियोजनबद्ध, पारदर्शक उपाययोजना करण्याचे आश्वासन शेट्टी यांनी दिले. प्रचाराच्या माध्यमातून मतदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून, विकासाबाबत आशा वाढल्याचे चित्र दिसून आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि सातत्य यांना प्राधान्य देण्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरेंद्र किराड, महेंद्र लालबिगे, मंगेश साखरे, समीर सय्यद या वेळी उपस्थित होते.