प्रभात वृत्तसेवा पुणे – मागील पाच वर्षांत रस्ते सुधारणा, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यांसह विविध योजनांच्या माध्यमातून प्रभागातील मूलभूत सुविधांना विकासकामातून बळकटी दिली. सोसायटी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छ परिसरासाठी केलेल्या कामांमुळेरामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर प्रभागाच्या विकासाला गती दिली. ही गती वाढवत स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित प्रभागासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काॅग्रेसचे हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केला. प्रभाग ११ मधील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कोपरा सभांना नागरिकांचा उस्त्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वस्ती भागासह सोसायट्यांमध्ये उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत औक्षण केले जात आहे. दिवसभरात भक्तीयोग सोसायटी, रामबाग कॉलनी तसेच श्रीराम कॉलनी, लेन नंबर ८, सुतारदरा अशा विविध ठिकाणी उमेदवारांनी पदयात्रा आणि कोपरा सभा घेत नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी नागरी सुविधा आणि आगामी विकासकामांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, सोसायटी भागाची सुरक्षा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, पथदिवे तसेच आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर विशेष भर देत, परिसरनिहाय उपाययोजना करण्याचे उमेदवारांनी सांगितले. प्रभागातील विकास हा नागरिकांच्या लोकसहभागातून होणे अपेक्षित आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय ठेवत कामांना गती दिली जाईल.