प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मतदानाचा संमिश्र उत्साह पाहायला मिळाला. काशेवाडी-डायस प्लॉट (प्रभाग २२), रविवार पेठ- नाना पेठ (प्रभाग २३) आणि कसबा गणपती- कमला नेहरू रुग्णालय (प्रभाग २४) या भागांत सकाळपासूनच मतदारांमध्ये निरुत्साह होता. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत या तिन्ही प्रभागांत मिळून सरासरी सुमारे ५५ टक्के मतदान झाले असून, काही ठिकाणी तांत्रिक बिघाड आणि गोंधळाचे वातावरण वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांची पाठ गुरुवारी सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीच्या दोन तासांत मतदारांनी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. सकाळी ९:३० वाजेपर्यंत तिन्ही प्रभागांत सरासरी केवळ ५ टक्के मतदान झाले होते. ११:३० वाजेपर्यंत जेमतेम १४ टक्क्यांपर्यंतच आकडा पोहोचला. दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग किंचित वाढल्याने ३:३० वाजेपर्यंत ३६.५६ टक्के नोंद झाली. सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मात्र, ५:३० वाजेपर्यंत सरासरी मतदानाची टक्केवारी ५५ टक्क्यांवर स्थिरावली. १२ मशिनमध्ये बिघाड मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रशासकीय चाचणीत १० बॅलेट युनिट आणि २ कंट्रोल युनिट अशा १२ मशिनमध्ये बिघाड झाल्याने त्या तातडीने बदलण्यात आल्या. प्रत्यक्ष मतदान सुरू असतानाही सायंकाळपर्यंत ११ मशिनमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर आल्या. मात्र, निवडणूक प्रशासनाने मशिन तत्काळ कार्यान्वित केल्याने वेळेचा अपव्यय झाला नाही, असा दावा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रभाग २४ मध्ये गोंधळ आणि तक्रारी प्रभाग २४ मध्ये मतदानाच्या दिवशी काही प्रमाणात तणाव आणि गोंधळ पाहायला मिळाला. येथील अटल बिहारी वाजपेयी मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. या प्रभागातील तीन मतदान केंद्रांवरील मशिन बंद पडल्याची तक्रार भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी केली. मशिन बंद असल्यामुळे मतदारांचा वेळ वाया गेल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाकडे मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने मशिन तातडीने बदलल्याचे सांगत वेळ वाढवून देण्यास नकार दिला. मतदान सुरळीत झाल्याचा दावा तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी निवडणूक यंत्रणेने त्या वेळेत सोडवल्या, त्यामुळे कुठेही वेळ वाढवून देण्याची गरज भासली नाही. संपूर्ण भवानी पेठ परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पहिल्यांदा सकाळी दहा वाजता प्रभाग २२ च्या मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रभाग २२ व २३ मधील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. प्रभाग २२ मध्ये सहा, प्रभाग २३ मध्ये ७ व प्रभाग २३ मध्ये सहा फेरी असतील, अशी माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.