प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची पायरी चढण्यासाठी रांगा लावून अर्ज भरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांचा शनिवारी हिरमोड झाला. ढोल-ताशा वाजवत, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करीत फटाके फोडून मुलाखतीसाठी आलेल्या अनेकांना अवघ्या दीड ते दोन मिनिटांतच माहिती देऊन माघारी फिरावे लागले. तर, तिकीट मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून भाजपशी असलेली एकनिष्ठा, प्रभागातील कामे, जनसंपर्क, नागरिकांमधील प्रतिमा आणि मी कसा किंवा कशी योग्य उमेदवार आहे, हे पटवून देण्यासाठी इच्छुकांनी करून आणलेले अहवाल, सादरीकरण, विकासकामांची माहिती त्यांना या वेळत देता आली नाही. त्यामुळे अनेकांनी मुलाखतीनंतर नाराजीचा सूर आवळला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे २ हजार ५०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सुमारे एक हजारांहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी दिवसभर डीपी रस्त्यावरील पक्ष कार्यालयात पार पडल्या. निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी या मुलाखती घेतल्या. मात्र, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तसेच वेळेचे बंधन असल्याने या नेत्यांचीही चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे प्रत्येकाला दोन ते चार मिनिटांचाच वेळ देण्यात आला. कोणाची नाराजी तर कोणाला विश्वास… महापालिका निवडणुकीसाठी गेल्या तीन वर्षांपासून तयारी केलेल्या इच्छुकांनी मागील तीन महिने देव पाण्यात ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात मुलाखतीसाठी केवळ दीड ते दोन मिनिटेच मिळाल्याने या कमी वेळेत काय सांगयाचे, असा प्रश्न अनेकांना पडला. तर, काही इच्छुक विचारलेल्या प्रश्नांमुळे गोंधळले होते. त्याच वेळी अनेकांनी नेमकेपणा आणि आत्मविश्वासाने उत्तरे दिल्याचे दिसून आले. या मुलाखतींना प्रामुख्याने सर्व नवीन चेहरे होते. तर, मागील निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव पत्काराव्या लागलेल्या उमेदवारांनीही गेल्या आठ वर्षांत कशा प्रकारे काम केले हे सांगण्यासाठी वेळ मागितला. मात्र, वेळेची मर्यादा असल्याने त्यांनाही तीन ते चार मिनिटातच मुलाखत देवून बाहेर पडावे लागले. “मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने शनिवारी आणि रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. उमेदवारांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामे आणि निवडून येण्याची क्षमता याचा विचार करूनच तिकीट दिले जाणार आहे.” – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप “मुलाखती दरम्यान उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातून ते निवडणूक लढण्यास सक्षम आहेत की नाही, याचा अभ्यास करण्यात आला. ज्यांनी पक्षसंघटनेची कामे केली आहेत आणि पक्षाला वेळ दिला आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही.” – गणेश बीडकर – महापालिका निवडणूक प्रमुख