प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीची प्रशासनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. येत्या बुधवारी ( दि. १५) मतदान होणार असून त्यासाठी शहरात ४०११ मतदार केंद्र असणार आहेत. या केंद्रातील ९०६ मतदार केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली असून तेथे प्रशासन तसेच पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानासाठी १४ हजार ५०० इव्हीएमचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी १७२ पथके तयार करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत ४ गुन्हे दाखल झाले असून, ६७ लाखाची रोकड जप्त केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त रवी पवार, निखिल मोरे यावेळी उपस्थित होते. ४०११ मतदान केंद्र मतदानासाठी ८०० ते ९०० मतदारांचे एक मतदान केंद्र असणार आहे. शहरात ४ हजार ११ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. मतदानासाठी २६ हजार कर्मचारी, ४ हजार १०० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. महापालिकेची निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी ३१ निवडणूक व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहेत. मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची छपाई, पूर्ण केली आहे. ४ हजार ११ केंद्रांसाठी ६ हजार ५०० साहित्य किट तयार केले आहेत. आणखी १५०० मशिनची मागणी पालिकेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. महिला मतदारांसाठी प्रत्येक प्रभाग दोन पिंक मतदान केंद्रे असणार आहेत. ३० हजार कर्मचारी नियुक्त महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत २६ हजार कर्मचारी, ४ हजारपेक्षा जास्त पोलिस सहभागी आहेत. यापैकी १२ हजार शासकीय कर्मचारी टपाली मतदानाद्वारे त्यांचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी मतपत्रिकेची नोंदणी झाली आहे.या शिवाय, मतमोजणी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी होणार असून त्या ठिकाणी प्रशासनाकडून ११०० कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली असून सुमारे ३ हजार कर्मचारी निवडणुकीत सहभागी झाले आहेत. दृष्टीक्षेपात मतदान -संवेदनशील मतदान केंद्रे – ९०६ -प्रत्येक प्रभागात महिला मतदान केंद्र (पिंक बूथ) – २ -प्रत्येक प्रभागातील आदर्श मतदान केंद्र – २ -क्षेत्रीय अधिकारी संख्या – ४५४ -मतमोजणी केंद्रे – १५ -मतदानानवेळी रुग्णवाहिका – ४५ -निवडणूक प्रक्रियेतील वाहने – ४३४ -मतदान केंद्रासाठी बस – ८६० -जीप -२५०