प्रभात वृत्तसेवा पुणे – ईव्हीएम मशीनच्या पेटीचे सील तुटलेले आहे, मशीनवरील नंबर आणि उमेदवारांना दिलेल्या नंबरमध्ये तफावत, मशीन परस्पर बदलल्याच्या तक्रारी करत उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतले. यावेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे प्रतिनिधींनी मतमोजणीवर बहिष्कार टाकत, निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबल्यामुळे अनेक मतमोजणी केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. प्रभाग २९ मध्ये मतमोजणीला सुरवात होताच मशीनमध्ये बदल झाले, सील तुटलेले असल्याचा आक्षेप मनसेचे राम बोरकर, वैभवन दिघे, ॲड. वंदना कडू यांनी घेत मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्यामुळे उमेदवारांसह प्रतिनिधींनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे पहिल्याच प्रभागाची मतमोजणी प्रक्रिया पार पडण्यास उशीर झाला. परिणामी प्रभाग ३० च्या मतमोजणीतही आक्षेप घेतल्यामुळे प्रभाग ३१ ची मतमोजणी रात्री सातनंतर सुरू झाली.प्रभाग २५ आणि २६ मध्येही सील तुटलेले, मशीनचे नंबर आणि कागदावरील नंबरामध्ये तफावत असल्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेसच्या रूपाली पाटील, मनसेचे गणेश भोकरे यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली. आमच्या भागात आम्हालाच मत पडत नसतील तर या मशीन सर्व सेट असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे काहीवेळासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबली होती. प्रभाग ११, १२ आणि ३१ मध्येही याच तक्रारी करत मतमोजणीवर आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया वारंवार थांबविण्यात आल्यामुळे रात्री उशीरापर्यंत मतमोजणीचे काम सुरू होते.