पुणे : प्रभागात वर्षानुवर्षे सुरू असलेली ठराविक लोकांची मक्तेदारी, वाढती वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्यांचे प्रलंबित प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रभागात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २४ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी, तसेच प्रभाग क्रमांक २४ व १३ मधील इतर उमेदवारांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शेट्टी यांच्यासह इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौक येथे भव्य जाहीर संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पॅनेलप्रमुख सदानंद कृष्णा शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुजाता शेट्टी या शब्दाला पक्क्या असून, विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवार आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आणि पुणे शहराला पुढे नेण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे प्रतिनिधी महापालिकेत असणे गरजेचे आहे. निधी उपलब्ध करून देण्याचे काम माझे आहे. मात्र, तो निधी योग्य पद्धतीने वापरून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे लोकप्रतिनिधी असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही पवार म्हणाले.