प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेची निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी समविचारी पक्ष म्हणून महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आघाडीच्या चर्चा सुरू करण्याचे आदेश पक्षाला दिल्यानंतर पुण्यात सोमवारी (दि. १५) महाविकास आघाडीसाठी एकत्र बैठक होणार आहे. काँग्रेस भवन येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यामुळे महाविकास आघाडी पुणे शहरात एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवणार, ही बाब जवळपास निश्चित मानली जात आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, शहरातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.पुणे महापालिकेच्या राजकारणात आघाड्यांचे प्रयोग नवे नाहीत. २००७ आणि २०१२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शहरातील सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करीत पुण्यातील राजकीय समीकरणे बदलली. मात्र, त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात सत्ता समिकरणे बदलेली आहेत. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता महापालिकेतही पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत शहरातील राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा, प्रभागरचना, संभाव्य जागावाटप, निवडणूक प्रचाराची दिशा आणि समन्वय यंत्रणा यावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पुणे महापालिका निवडणुकीसाठीची एकत्रित दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. मनसे बैठकीपासून दूर … महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांकडून पुण्यात एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी रविवारी (दि.१४) या दोन्ही पक्षांची अनौपचारीक बैठक होणार आहे. त्यामुळे, मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सोबत निवडणुकीला सामोरे जाणार की महाविकास आघाडीत सहभागी होणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. दुसरीकडे मनसेकडूनही कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे तूर्तास या बैठकीपासून दूरच असणार आहे.