प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची चाढाओढ अखेर मंगळवारी संध्याकाळी शांत झाली. गेल्या दहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी भाजप आणि राष्ट्रवादीतच झडल्या, तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बड्या नेत्यांनी प्रचार फेरी आणि एखाद दुसरी सभा वगळता प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याने या पक्षांच्या उमेदवारांना स्वत:च्या ताकदीवर भाजप आणि राष्ट्रवादीचा सामना करावा लागणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या भेटी घेतल्या, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत प्रचाराची सांगता केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने भाजपच्या प्रचाराची सांगता झाली. भाजप- राष्ट्रवादीतच रंगला सामना राज्यातील महायुतीत एकत्र असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असले, तरी पुण्यात ते स्वतंत्र लढत आहेत. दुसरीकडे महापालिकेतील सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून, काँग्रेस, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आघाडी केली आहे. महाविकास आघाडीला रामराम करत आम आदमी पक्षही या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. मात्र, या दहा दिवसांच्या प्रचारात खरा सामना भाजप आणि राष्ट्रवादीतच रंगल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रात व राज्यात भाजपसोबत असलो, तरी पुण्यात भाजपचे त्रिकूट कारभारी बदला, असा नारा दिला. त्यामुळे प्रचारात आरोप- प्रत्यारोप रंगले. राष्ट्रवादीकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी दिल्याने भाजपने राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी थेट जैन हाॅस्टेल प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत जय जिनेंद्र नारा देत भाजपची कोंडी केली. त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात थेट मेट्रो आणि पीएमपी मोफत करण्याची घोषणा करत भाजपची कोंडी केली. त्यामुळे अजित पवारांच्या या आश्वासनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना खुलासा करावा लागलाच; पण पुण्यात प्रचाराला आलेल्या फडणवीस यांनाही पवारांचे आश्वासन खोडून काढण्याची वेळ आली. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून आले. इतर पक्षांच्या नेत्यांची पाठ शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस प्रचार फेरी आणि दोन सभा घेतल्या. शिवसेनेच्या कोणत्याही इतर मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. पुण्यात स्थानिक पातळीवर केवळ विधान परिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या सभा झाल्या. काँग्रेसच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, सतेज पाटील यांच्या काही उमेदवारांसाठी सभा झाल्या. मनसे उमेदवारांसाठी अध्यक्ष राज ठाकरे यांची शेवटची दिवशी प्रचार फेरी झाली. शिवसेना पक्षाच्या प्रचारासाठी मुंबईतील संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, सचिन अहिर यांनी काही उमेदवारांसाठीच सभा घेतल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने राष्ट्रवादी पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी उमेदवारांच्या प्रचार फेरीत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.