प्रभात वृत्तसेवा पुणे – क्षेत्रफळाच्या दुष्टीने राज्यातील पहिल्या क्रमांकाची आणि उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस आहे.२००७ नंतर पुण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने पुणे पॅटर्न राबवित काॅँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. त्यानंतर राष्ट्रवादीने २०१२ मध्ये महापालिकेवर काँग्रेसच्या मदतीनेच सत्ता मिळविली. त्यानंतर मात्र दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता काबीज करत असलेल्या भाजपने पुण्यात राष्ट्रवादीला धक्का देत महापालिकेची सत्ता काबीज केली असून, या निवडणुकीत पुन्हा भाजपने एकहाती सत्तेसाठी साम, दाम, दंड भेद या सर्वांचा वापर केला आहे. मात्र, भाजपला महापालिकेचा सत्ता सोपान चढण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत थेट अजित पवारांनीच भाजपच्या विरोधात आधी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगत भाजपलाच धक्का दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. काय सांगते आकडेवारी महापालिकेत २००२ मध्ये भाजपच्या सर्वाधिक ३३ जागा निवडून आल्या होत्या. त्या वेळी दोन सदस्यांच्या प्रभागात भाजप आणि शिवसेना महायुतीला पुणेकरांनी कौल दिला होता. त्यानंतर पुन्हा २००७ मध्ये तीन सदस्यांच्या प्रभागात भाजपची संख्या २५ वर आली. २०१२ मध्ये महापालिकेत राष्ट्रवादीचे ५४ उमेदवार निवडून आले, तर भाजपच्या सदस्यांची संख्या कायम राहिली. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपने थेट २६ वरून ९८ जागांवर विक्रमी विजय मिळविला. महापालिकेच्या इतिहासातील हा सर्वाधिक मताधिक्याचा आकडा होता. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत भाजपचे १६२ मध्ये ९८ नगरसेवक निवडून आले असले, तरी राष्ट्रवादीचेही ३८ नगरसेवक निवडून आले. मात्र, भाजपकडून २०१७ मध्ये सत्ता मिळविण्यासाठी इतर राजकीय पक्षांतील नगरसेवकांना पक्ष प्रवेश देण्यात आला. त्यामुळे भाजपला एकहाती मिळवता आली. त्यानंतर या निवडणुकीतही भाजपकडून हीच खेळी करण्यात आली आहे. त्यात भाजपने सत्ता कायम ठेवण्यासाठी आपल्या जवळपास ३५ टक्के माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर इतर पक्षांतील इतर नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, त्यांच्याकडून काँग्रेस, भाजप, मनसे, तसेच शिवसेनेच्या इच्छुकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीनेही तीच खेळी खेळल्याने आता भाजपची कोंडी झाल्याचे चित्र आहे.