पुणे : गेल्या पाच वर्षांत शहरात केलेली विकासकामे ही भाजपची ओळख आहेत, या कामांमुळे पुणेकरांचे जीवनमान गतीमान झाले आहे. त्यामुळे, केंद्रशासन, राज्यशासन आणि महापालिकेत केलेल्या विकासकामांच्या जोरावर महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे प्रभाग २३ रविवार पेठ- नाना पेठेच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार ऋतुजा तेजस गडाळे, पल्लवी जावळे, अनुराधा मंचे आणि विशाल धनवडे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ यांनी पदयात्रा काढली. या वेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, भाजयुमो प्रदेश सचिव तेजस गडाळे, भाजप कसबा विधानसभा समन्वयक राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून प्रभागातील समस्या मांडण्यात आल्या, तसेच महापालिकेच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षाही मोहोळ यांच्याकडे व्यक्त केली.