पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शहरातील सर्व ४१ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. उपलब्ध प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार सुस-बाणेर-पाषाण हा प्रभाग सर्वाधिक मतदान झालेल्या प्रभागांमध्ये आघाडीवर राहिला आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुस-बाणेर-पाषाण प्रभागात ६२ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याखालोखाल खराडी-वाघोली, शिवणे-खडकवासला-धायरी पाट, मोहम्मदवाडी-उंड्री आणि मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरा नळी या प्रभागांमध्येही मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. याउलट अपर सुपर इंदिरानगर प्रभागात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली असून येथे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २२ हजार ३६८ मतदारांनी मतदान केले. येरवडा-गांधीनगर, छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी, गोखलेनगर-वाकडेवाडी आणि मुकुंदनगर-सॅलसबरी पार्क या प्रभागांमध्येही तुलनेने कमी मतदान झालेले दिसून येते. शहरातील मध्यवर्ती पेठा, पूर्व आणि पश्चिम उपनगर तसेच नव्याने समाविष्ट भागांमध्ये मतदानाचा वेग वेगवेगळा असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ३७ टक्के मतदान पार पडले आहे.