प्रभात वृत्तसेवा पुणे – स्वराज्य निर्मितीत मुळशीतील मावळ्यांनी जशी छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली. तशीच पुणे शहराच्या निर्मितीसाठी आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांना साथ द्यावी. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केले.या वेळी मुळशीकरांनी आमचे मत घड्याळालाच, असा एकजुटीचा जयघोष केला. भोर-रायगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत प्रभाग १० आणि ११ प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुळशीकरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भूकुम, भूगाव, वारजे, उत्तमनगर, शिवणे आणि आसपासच्या परिसरात स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे नियोजन माजी सभापती बाबा कंधारे, अंकुश मोरे, शांताराम इंगवले यांनी केले. या वेळी रवींद्र कंधारे, कालिदास गोपालघरे, अंकुश उभे, धैर्यशील ढमाले, माऊली साठे आदी मुळशीकर उपस्थित होते.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती नीलेश शिंदे आणि कांता नवनाथ खिलारे यांनी रामबाग कॉलनी, माजी सैनिक वसाहत, सिग्मा वन, स्वयंसिद्धा सोसायटी, ऋतुजा सोसायटींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारी आणि सातत्याने संपर्कात राहणारी भूमिका सकारात्मक असल्याची भावना व्यक्त करत, नागरिकांच्या सहकार्याने सोसायटी भागासह प्रभागाचा समतोल, सुरक्षित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करत राहण्याचा निर्धार हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केला.