पुणे : पुण्यात २००७ मध्ये काँक्रिटीकरण झालेला सोमवार पेठेतील खडीचे मैदान ते पारगे चौक हा रस्ता आज तब्बल १९ वर्षांनंतरही मजबूत अवस्थेत आहे. या रस्त्याच्या धर्तीवर प्रभागातील इतर रस्त्यांची कामे करणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २४ (ड) चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मतदारांना दिली. बिडकर यांनी या परिसरात शनिवारी मतदारांशी संवाद साधला. बिडकर म्हणाले, की २००७ पूर्वी मंगळवार पेठेत प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील पहिला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता. त्या रस्त्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर सोमवार पेठेतही काँक्रीटचा रस्ता करावा, यासाठी मी महापालिकेत आग्रह धरला. रस्त्यासाठी सोमवार पेठेतील ऐतिहासिक खडीचे मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून सुरू होणाऱ्या दक्षिणोत्तर रस्त्याची निवड करण्यात आली होती. हा रस्ता नानल शास्त्री या नावाने ओळखला जातो. यापूर्वी येथे डांबरी रस्ता होता आणि पावसाळ्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत असे. बिडकर यांच्या पुढाकारातून २००७ नंतर नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. त्यानंतर आजतागायत या रस्त्याला कोणतीही मोठी दुरुस्ती करावी लागलेली नाही. अशाच पद्धतीने इतर रस्तेही केले जाणार आहेत. येत्या काळात प्रभाग क्रमांक २४ मध्ये आणखी मोठी विकासकामे करण्यासाठी नागरिकांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही बिडकर यांनी केले.