प्रभात वृत्तसेवा पुणे – भाजपशी युती व्हावी म्हणून, आम्ही सन्मानजनक २५ जागा मागितल्या. मात्र, युती झाली नसल्याने शिवसेनेचे ११८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ६३ महिला आणि ५५ पुरूष उमेदवार असून १५ प्रभागात चार पॅनल उभे असल्याची माहिती शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश युवासेना सचिव किरण साळी आणि उमेदवार उपस्थित होते. युतीत मनभेद होवू नये यासाठी आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. कोणी सातत्याने बळाच चिथावणी दिली, तर त्याला शिवसेना बळी पडणार नाही, असे सांगून शिवसेना अवास्तव मागणी करत असल्याच्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विधानावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. ते महापौर होते आणि आजच्या शहराच्या स्थितीला ते किती जबाबदार आहेत, याचा त्यांनी विचार करावा असेही त्यांनी सूचवले. एकीकडे युती धर्म म्हणायचे आणि आमचेच नगरसेवक पक्षात घेऊन त्या जागांवर दावा सांगायचा, हे बरोबर नाही. आम्हाला दातृत्वाची गरज नाही. आम्हाला योग्य सन्मान मिळाला नाही, अशी खंतही गोऱ्हे यांनी व्यक्त केली. युती केली किंवा नाही केली, यामुळे आम्ही लहान-मोठे ठरत नाही. जनता जर्नादन आम्हाला काय विश्वास देतय, यावर आमचे समाजामधील स्थान ठरते, असेही त्या म्हणाल्या. प्रचाराचा प्रारंभ सर्व उमेदवारांच्या प्रचार अभियानाचा प्रारंभ उद्या, शनिवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून होईल. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी आदी उपस्थित राहणार आहेत. ९ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.