प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांच्या प्रचाराची सांगता जोरदार शक्तिप्रदर्शन करून करण्यात आली. पॅनल प्रमुख आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. संपूर्ण प्रभागात काढण्यात आलेल्या या फेरीस मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रभागात शेट्टी यांचा विजय निश्चित असल्याच्या घोषणाही दिल्या.महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यापासून माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांनी गेल्या दहा ते बारा दिवसांत प्रभागात वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारांशी संवाद साधला आहे. याशिवाय सदानंद शेट्टी यांचा या परिसरात असलेला जनसंपर्क आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रभागात त्यांच्या कार्यकर्त्यांचे, तसेच नागरिकांचे मोठे संघटन असून, या प्रचारात या कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. या प्रचारावेळी सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टी यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी मतदारांनीही शेट्टी यांना पुन्हा महापालिकेत पाठविण्याचे आश्वासन दिले.